MARATHI

अगदी ब्रिटिश काळापासूनच भारतीय रंगकर्मींनी आपल्या कामांमधून भारताची विविधता वेळोवेळी प्रकट केली आहे, साजरी केली आहे.  आम्ही स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून नाटके केली आहेत, आम्ही सामाजिक प्रश्नांना नाटकांतून हाताळले आहे, सामाजिक समता आणि सहभाव यांसाठी आम्ही वेळोवेळी ठामपणे उभे राहिलो आहोत. पितृसत्ता - ब्राह्मण्यवाद - जातीआधारित शोषण यांना कायमच आव्हान दिले आहे.  धर्मिक फुटीरतावाद , कट्टरतावाद, संकुचितपणा, अविवेकीपणा आदी शक्तींच्या विरोधात उभे राहण्याची भारतीय रंगकर्मींची गौरवशाली परंपरा राहिली आहे. आम्ही वंचितांमधून बोललो आहोत , आम्ही वंचितांच्या बाजूने बोललो आहोत. गाणी ,नृत्य, विनोद, मानवी कथा यांतून गेली दीडशे वर्षे आम्ही सततच एका धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी, न्याय्य, सर्वसमावेशक आणि सार्वभौम भारताची कल्पना केली आहे.  

आज भारताची ही सर्वसमावेशक संकल्पनाच नेमकी धोक्यात आली आहे.  आज आमचे नाच, गाणी, विनोद धोक्यात आले आहेत. आज आमचे प्रिय संविधान देखील या तडाख्यातून सुटलेले नाही. अशा संस्था आणि व्यासपीठे जिथे वाद-संवाद-चर्चा -मतभेद यांचे स्वागत असेल, जिथे ते सहजपणे व्यक्त होतील, त्यांचीच घुसमट होते आहे. प्रश्न विचारणे,  खोटारडेपणा उघड करणे, खरे बोलणे यांना 'राष्ट्रद्रोही' ठरवले जाते आहे. विद्वेषाची ही बीजे आता थेट आमच्या खाण्यापिण्यांत, सण-समारंभांत, प्रार्थनांमध्ये मिसळली आहेत.

विद्वेष आमच्या दैनंदिन जीवनात देखील ज्या विविध मार्गांनी अवतरतो आहे, ते पाहता, एक नक्की की ही धोक्याची घंटा आहे. आणि हे थांबलेच पाहिजे. थांबायलाच हवे.

आगामी निवडणुका नि:संशयपणे स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील सर्वाधिक संवेदनशील निवडणुका आहेत. लोकशाहीने खरे तर दुर्बलांना सक्षम बनविले पाहिजे, वंचितांना सक्षम बनविले पाहिजे. प्रतिप्रश्न ,चर्चा, ज्वलंत परस्पर-विरोध याशिवाय लोकशाही कृतिशील राहूच शकत नाही. आणि नेमके हेच सगळे विद्यमान सरकारने पद्धतशीरपणे संपवायला सुरुवात केली आहे. विकासाची स्वप्ने दाखवून पाच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपने हिंदुत्ववादी गुंड डोळ्यांना पाेसून द्वेष आणि हिंसेच्या राजकारणात त्यांना मुक्त शिरकाव दिला आहे. ज्या माणसाने पाच वर्षांपूर्वी आपण देशाचा त्राता असल्याची प्रतिमा निर्माण केली होती, त्याच माणसाने आपल्या आततायी धोरणांनी कोट्यवधी लोकांचा रोजगार संपवला. काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले पण प्रत्यक्षात त्याऐवजी धनदांडगे लोक देश लुटून फरार झाले. मूठभर अतिश्रीमंतांच्या संपत्तीत कैकपटींनी वाढ झाली आणि कोट्यवधी गरीब अधिकच गरिबीच्या खाईत लोटले गेले.

आम्ही भारतीय रंगकर्मी भारतीय जनतेला आवाहन करीत आहोत की, आपले भारतीय संविधान, आपले सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष वातावरण याचे आपण रक्षण करूया.  आम्ही असेही आवाहन करतो की, प्रेम -करुणा -समता -सामाजिक न्याय यांच्या बाजूने मतदान करा आणि देशाला अंधारात लोटणाऱ्या नृशंस शक्तींना पराभूत करा.

आमचे आवाहन आहे की, असहिष्णू -विद्वेषी -विभाजनवादी शक्तींना सत्तेतून घालवा. भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांच्या विरोधात मतदान करा.  दुर्बळांच्या सक्षमीकरणासाठी मतदान करा. स्वातंत्र्यासाठी आणि वैज्ञानिक विचाराच्या रक्षणासाठी मतदान करा. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मतदान करा. धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक भारताच्या स्वप्नपुूर्तीसाठी मतदान करा. स्वप्न पाहण्याच्या स्वातंत्र्यासाठी  मतदान करा. विवेकाने मतदान करा.

Are you a theatre artist? Like to endorse the statement?
Name and Place:

Your Email: (required)

Your theatre credentials and other details : (required)